बदलाव ! काही दिवसांपुर्वीच बी जी टुर्स मार्फत सहकुटुंब उत्तरप्रदेशातील तिर्थस्थळांना भेट देण्याचा योग आला. राममंदिराचा निकाल आल्यावर आई वडिलांना काशी-अयोध्येला घेवून जाण्याची तीव्र इच्छा झाली. पण नंतर लगेच कोव्हिड आला आणि सर्व प्लॕन फिस्कटले. दुर्दैवाने दुसऱ्या लाटेत वडिल गेले. कोव्हिड संपल्यावर आईला या तिर्थयात्रेला घेऊन जायचे असे ठरवले होते. सुदैवाने सगळे जुळून आले आणि आम्ही सहपरिवार तिर्थयात्रेला निघालो. आमचा पंधरा-वीस कुटुंबांचा 38-40 जनांचा एक ग्रुप आहे. वयाने 88 वर्षांचे पण उत्साहात अगदी तरूण असलेले आमचा शेजारी बापु पंचवाघ यांच्या पुढाकाराने यापुर्वी या ग्रुपच्या अनेक ट्रिप झाल्या आहेत. बापू म्हणजे आम्हा सर्वांसाठी 'फादरली फिगर' आहेत. बी जी टुर्स कडून बापू आमच्या ट्रिप कस्टमाईज करून घेतात. आम्ही विमानाने सर्वप्रथम प्रयागराजला गेलो. तेथून आम्हाला आमची बस मिळाली. पुढे आठ दिवस ही आरामदायक वातानुकुलीत बस हे आमचे वाहन होती. आमच्या सोबत पाककलेत तरबेज असलेले मराठी आचारी दिलेले होते. पिठले-भाकरी पासून पुरण-पोळी पर्यंत सर्व काही मेनू वर होते. आठ दिवस सर्वांची खान्याची चंगळ होती. महत्त्वाचे म्हणजे बाहेरचे खाणे नसल्याने संपुर्ण ट्रिप मध्ये कुणाचे पोट खराब झाले नाही. राहण्याची व्यवस्था केलेले सर्व हॉटेल्स् स्वच्छ होते. दुपारच्या जेवणानंतर आमचे चित्रकुटला जाणे झाले. विंध्य पर्वतरांगांमधून उगम पाऊन उत्तरेकडे वाहणाऱ्या मंदाकिनी नदीच्या काढावर वसलेला चित्रकुट धाम मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशच्या अगदी सिमेवर आहे. दुष्काळात अत्री ऋषींनी तप करून ही मंदाकिनी नदी अवतरीत केली होती अशी आख्यायिका आहे. ही मंदाकिनी नदी पुढे यमुनेला जाऊन मिळते. श्रीराम-सीता-लक्ष्मण वनवासाला निघाल्यावर सर्वप्रथम प्रयागराजला महर्षी भारद्वाजांच्या आश्रमात गेले. वनवासात कुठे रहावे असा सल्ला विचारल्यावर त्यांनी रामाला चित्रकुट पर्वत परिसरात तपश्चर्या करणाऱ्या अत्री ऋषींच्या आश्रमात जावून त्यांचा सल्ला घेण्याचे सुचवले. त्यानुसार राम चित्रकुटला आले. अत्री ऋषींच्या भेटीनंतर त्यांनी रामाला चित्रकुट पर्वतावरच निवासाचा सल्ला दिला. त्यानुसार राम-सीता-लक्ष्मणाने वनवासातील चौदा वर्षांपैकी साडे अकरा वर्षे चित्रकुटच्या परिसरात तपश्चर्या करत घालवले. या वनवासकाळात रामाचा केवळ पद स्पर्ष झाल्याने येथील विविध स्थळांना तिर्थस्थळांचा दर्जा प्राप्त झाला. आमच्या तिर्थयात्रेची सुरूवात याच पावन भुमीतून झाली होती. चित्रकुटात आम्ही सर्वप्रथम राम-भरत भेटीने पावन झालेला रामघाट पाहिला. भारताच्या संस्कृतीत त्यागाला नेहमी सर्वोच्च सन्मान मिळाला आहे. पितृ वचनासाठी राज्याचा त्याग करून राम वनवासाला निघाला आणि चित्रकुटाला आला. भावासाठी लक्ष्मण आणि नव-यासाठी सिता राजभोगाचा त्याग करून रामासोबत वनवासाला निघाले. आजोळी गेलेल्या भरताला हा सर्व प्रकार कळाल्यावर आपल्या भावावर उत्कट प्रेम करणाऱ्या भरतानेही सहज चालून आलेल्या राज्याचा त्याग केला आणि रामाचा शोध सुरू केला. भरत आणि लक्ष्मण हे रामाचे सावत्र भावंडे होती हे जास्त महत्वाचे. चित्रकुटाच्या रामघाटावर भरताची आणि रामाची भेट झाली होती. पुढील इतिहास सर्वाना माहित आहे. राम-भरताच्या त्यागाच्या आणि प्रेमाच्या संस्कारांनी पाव झालेल्या त्या भुमीचे दर्शन घेऊन सर्वांचे मन धन्य झाले. येथे मला आणखी एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली. बापाला तुरुंगात टाकून वा ठार मारून किंवा सख्ख्या भावाचे गळे चिरून गादीवर बसण्याची निर्दयी परंपरा भारतीय नक्कीच नव्हती. त्यानंतर आम्ही अत्री ऋषी आणि सती अनुसयेचा आश्रम पाहिला. एकाबाजूने मंदाकिनी नदी, दुसऱ्या बाजूने उंच डोंगर आणि मध्यभागी वसलेला हा रम्य आश्रम श्रीदत्तांचे जन्मस्थळ आहे. त्यानंतर आम्ही रोप वे ने हनुमान धारा मंदीर पाहिले. लंकादहनानंतर हनुमानाने शेपटीची आग लगेच विझवली असली तरी तिचा दाह मात्र थांबला नव्हता. त्यासाठी श्रीरामांनी बाण मारून पर्वतातून ही धारा उत्पन्न केली होती. त्यात शेपटी बुडवल्यावर मात्र हनुमानाच्या शेपटीचा दाह पुर्ण थांबला होता. कदाचित हनुमानाच्या रामावर असलेल्या श्रद्ध्येचा हा परिणाम असावा. येथील रोप वे मधून प्रवास करणे रोमांचक आणि मनोहर होते. त्यानंतर आम्ही गुप्तगोदावरी गुहांचे दर्शन केले. या गुहांमध्ये रामाने काही काळ घालवला होता. त्या वेळी गोदावरी लहान मुलीचे रूप घेऊन रामाला भेटायला आली होती अशी अख्यायिका सांगितली जाते. या गुहा अतिशय सुंदर आहेत. त्यानंतर आम्ही राम-लक्ष्मण-सीतेचा बहुतेक काळ निवास असलेल्या चित्रकुट पर्वताचे दर्शन घेतले. भाविक या पर्वताला चालत पाच किलोमिटरची प्रदक्षिणा घालतात. आमच्या सोबत बरेच वयस्क लोक असल्याने ते शक्य नव्हते. यानंतर आम्ही राम आणि सितेचे पायाचे ठसे असलेल्या स्फटिकशिळा पहायला गेलो. या ठिकाणी अशी आख्यायिका सांगितली जाते की जयंत नावाच्या इंद्राच्या मुलाने कावळ्याचे रूप धारण करून सीतेच्या पायाला येथे चोच मारली होती. यावर रामाने शिक्षा म्हणून त्या कावळ्याचा एक डोळा फोडला होता. या स्फटिकशिळेचे दर्शन घेवून आम्ही परत हॉटेलकडे परतलो. दुसऱ्या दिवशी एक आगळावेगळा कार्यक्रम होता. चित्रकुट ही भारतरत्न नानाजी देशमुखांची राजकारणातून निवृत्तीनंतरची कर्मभुमी आहे. त्यांचे कार्य आम्हाला पहायचे होते. नानाजी देशमुख मुळचे आपल्या परभणीचे. त्या काळात त्यांचे BITS Pilani मधून शिक्षण झाले होते. कुठे तरी लठ्ठ पगाराची नोकरी करण्याऐवजी नानाजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुर्णवेळ प्रचारक होऊन राष्ट्रकार्यासाठी आयुष्य खपवण्याचे ठरविले. संघाचा पुर्ण वेळ प्रचारक होणे म्हणजे कर्मयोग आणि संन्यास यांचे एकत्रीकरण. संघाने त्यांना उत्तर प्रदेशात गोरखपुर आणि गोंडा परिसरात कार्य करायला सांगितले. येथे त्यांनी प्रचंड कार्य उभे केले. 1952 साली त्यांनी गोरखपुरला पहिले सरस्वती शिशू मंदिर ही शाळा सुरू केली. या रोपट्याच्या पुढे वटवृक्ष झाला. आज देशभरात त्याच्या 30 हजार शाखा झाल्या आहेत. नंतर संघाच्या आदेशानुसार ते राजकारणात उतरले. भारतीय जनसंघाच्या उत्तरप्रदेशच्या जनरल सेक्रेटरी पदाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. अटल बिहारी वाजपेयी यांचे वक्तृत्व आणि नानाजी देशमुखांची संघटन कौशल्य एकत्र आल्याने उत्तर प्रदेशात जनसंघाने मजबुतीने पाय रोवले. 1967 साली राम मनोहर लोहियांच्या सोबतीने त्यांनी उत्तर प्रदेशातील पहिले बिगर काँगेसी सरकार स्थापन केले. पुढे विनोबा भावेंच्या भुदान चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. 1977च्या लोकसभा निवडनुकीतून ते उत्तर प्रदेशातील बलरामपुरातून लोकसभा मतदार संघातून निवडून गेले. मुरारजी देसाईंनी त्यांना कॕबिनेट मंत्रिपद बहाल केले. पण साठ वय पुर्ण झालेले असल्याने केंद्रातील कॕबिनेट मंत्रिपद नम्रपणे नाकारून नानाजींनी राजकारणातून संन्यास घेतला. त्यानंतर त्यांचा निवास चित्रकुटला होता. राजकारणातून संन्यास घेतला असला तरी त्यांचे समाजसेवेचे व्रत चालूच होते. निवृत्तीनंतर व्यक्ती किती मोठे काम करू शकतो याचे विस्मयकारक उदाहरण म्हणजे नानाजी देशमुख! सर्वप्रथम त्यांनी चित्रकुट परिसरात लाखो झाडी लावून परिसर हिरवा केला. नानाजींनी दिनदयाल अनुसंधान संस्थेमार्फत चित्रकुट जिल्हातील पाचशे गावात 'समाज शिल्पी दांपत्य योजना' सुरू केली. या योजनेत एक ग्रॕजुएट जोडपे अल्प मानधनावर नानाजींचे डोळे आणि कान होऊन प्रत्येक खेड्यात रहायला गेले. या जोडप्या मार्फत नानाजींनी खेड्यातील समस्या समजून घेतल्या. मग त्यानुसार सहा आयामावर विकासकामे सुरू केली. बघता बघता ग्रामिण भागात आधुनिक शेती, शिक्षा, रोजगार, स्वच्छता, आरोग्य, तंटामुक्ती या क्षेत्रात कामाचा डोंगर उभा राहिला. 1991 साली नानाजींनी महात्मा गांधी चित्रकुट ग्रामोदय विश्वविद्यालय स्थापन केले. येथे कला, विज्ञान आणि ॲग्रिकल्चर पासून आय टी पर्यंत 16 वेगवेगळे अभ्यासक्रम शिकवले जातात. चित्रकुट परिसरातील पाचशे गावांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी चित्रकुटात जमीन दान मिळवून 43 एकरात आरोग्यधाम सुरू केले. येथे आम्हाला पाश्चात्य ॲलोपथी आणि आपला प्राचीन आयुर्वेद यांचे सुंदर एकत्रीकरण पहायला मिळाले. तेथील हर्बल गार्डन मध्ये औषधी वनस्पती वाढवून त्यांच्याच रसशाळेत आयुर्वेदीक औषधे तयार होत होती. आरोग्यधाममध्ये नातेवाईकांच्या मुक्कामाची सोय तर होतीच पण कँटीन पासून अगदी मनोरंजक आणि ग्रंथालयापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध होत्या. नानाजींनी चित्रकुटात एक भव्य गोशाळा उभारली आहे. गोशाळा अतिशय स्वच्छ ठेवलेली होती. शेवटी आम्ही नानाजींनी उभारलेले 'राम दर्शन' पाहिले. येथे आम्हाला रामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांतील सुंदर चित्रे माहितीसह पहायला मिळाली. नानाजींच्या या राम दर्शनात रामाच्या त्यागमय आयुष्याचा जीवनपट अतिश प्रभाविपणे समोर उभा केला आहे. नानजींचे सर्व काम पाहून आम्ही सगळे लोक भारावून गेलो. भोजनानंतर त्या दुपारी प्रयागराजला प्रवास झाला. रात्री प्रयागराजला मुक्काम झाला. एका हॉटेल मध्ये सर्वांसाठी रुम उपलब्ध नसल्याने आमच्या दोन फॕमीलीला दुसऱ्या छोट्या हॉटेलमध्ये उतरावे लागले होते. रात्री हॉटेलच्या मॕनेजरशी गप्पा मारताना कळाले की तो आधी मुंबईमध्ये सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करात होता. करोना काळात न सांगता घरी आला आणि जॉब गेला. परत गेल्यावर मनासारखे पॕकेज मिळेना. मग तो परत आला आणि हा जॉब जॉईन केला. पण आता प्रयागराजलाच IT पार्क आले आहे आणि Infosys सारख्या मोठ्या कंपनी इकडे आल्या आहेत. तो आता तिथेच जॉब करणार आहे. कुठल्याही भागात इंडस्ट्री सुरू होण्यासाठी चार गोष्टी लागतात. रस्ते, वीज, पाणी आणि सुरक्षा. गंगामाईच्या आशीर्वादाने युपी मध्ये पाणी मुबलक आहे. योगीं-मोदींनी रस्ते आणि वीज समस्या ब-यापैकी सोडवली आहे. पण आधी युपी मध्ये गुन्हेगारीचा प्रश्न भयंकर होता. सगळीकडे राजकारण्यांच्या आशीर्वादाने युपी मध्ये सर्वत्र रंगदारी(खंडणी) आणि हप्तेखोरी बोकळली होती. योगींनी युपीतून ही गुन्हेगारी जवळपास संपवून टाकली आहे. एकट्या प्रयागराजमध्ये 73 इन्कांऊटर झाले आहेत. गेल्या चार-पाच वर्षात संपुर्ण युपीत 9 ते 10 हजार इंनकाऊंटर झाले आहे. 3000 गुंड गंभीर जखमी झाले आहे. 18000 गुंडांनी इंकाऊन्टरच्या भीतीने पोलिसांकडे स्वतःहुन आत्मसमर्पण करत गुन्हेगारीच्या नावाने कानाला खडा लावला आहे. खंडणीखोरांची भीती संपल्याने अनेक मोठ्या उद्योग धंद्यांनी उत्तरप्रदेशकडे मोर्चा वळवला आहे. तो तरूण बदलत्या युपी बद्दल भरभरून सांगत होता. तो त्याच्या भविष्याबाबत आश्वस्त वाटत होता. युपीची ती बदलती परिस्थिती पाहुन खुप बरे वाटले. दुसऱ्या दिवशी सर्वांनी होडीतून प्रयागराजच्या गंगा आणि यमुनेच्या पवित्र संगमाचे दर्शन घेतले. संगमावर असलेल्या अक्षयवटाचे आणि काही मंदीरांचे दर्शन घेतले. दुपारी काशीकडे प्रवास झाला. संध्याकाळी काशीला पोहचलो. लगेचच दशाश्वमेध घाटावर गंगा आरती पहायला गेलो. ती भव्य आरती पाहून सर्वांचे मन अगदी प्रसन्न झाले. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे काशी विश्वेश्वराचे दर्शन केले. पहाटे गर्दी नसल्याने शांत दर्शन झाले. आमच्या सोबत आधी काशी मंदीराला भेट दिलेले सहप्रवासी होते. मोदींनी नव्याने बांधलेल्या काशीविश्वनाथ मंदीर काॕरीडॉरचे खरे महत्त्व त्यांना जाणवले होते. मंदीराभोवतीच्या आधीच्या गल्लीबोळा आणि गलिच्छपणा त्यांनी पाहिला होता. त्या पार्श्वभूमीवर आत्ता उभ्या असलेल्या भव्य काॕरीडॉरवर ते भरभरून बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्वाभिमानाचा भाव झळकत होता. त्यावरून मोदी नक्की कुठल्या पातळीवर बदल करत आहेत याचा थोडा अंदाज आला. काशी विश्वनाथाच्या दर्शनानंतर सकाळी घाटावर पुजाअर्चा आणि श्राद्धकर्म पार पाडले. स्थानिक लोकांच्या तोंडून घाटाच्या सध्याच्या स्वच्छतेचे आणि आधीच्या गलिच्छतेची तुलना वारंवार होत होती. आम्हालाही घाटाची स्वच्छता जाणवत होती. कुठेही अजिबात कचरा नव्हता. जागोजागी डस्ट बीन लावलेले होते. गंगेचे पाणी मात्र अजुन थोडे गढूळ होते. घाटावरील प्रसन्न वातावरणाने आणि पुजेतील मंत्रोच्चारांमुळे मन अगदी आनंदी झाले. पुजा आणि श्राद्धकर्म संपल्यावर आम्ही हॉटेलवर थोडा आराम केला. मग बनारस विश्व विद्यालयातील भव्य बिर्ला मंदिराचे दर्शन केले. त्याच्या दुसऱ्या दिवशी मोदी 'काशी-तमीळ संगमम्' या कार्यक्रमानिमित्त BHU मध्ये येणार होते. त्या कार्यक्रमाच्या तयारीची सर्वत्र लगबग चालू होती. भारतातील भाषा आणि प्रांत भेद मिटवण्यासाठी काशीबद्दल असलेल्या काॕमन अस्मितेचा मोदी उपयोग करून घेत होते. ही संकल्पना अगदी छान वाटली. जाती, भाषा, प्रांत भेदांभुळेच देश हजार वर्षे गुलामगिरीत पडला होता. अन्यथा त्या काळीही भारतीय संख्येने इतके जास्त होते की नुसत्या थोबाडीत मारून त्यांनी आक्रमक संपवले असते. असो! देर आए, पर दुरूस्त आए. या मुद्द्यावर चांगली पावले उचलली जात आहेत हे पाहून बरे वाटले. त्या रात्री आम्ही होडीतून वाराणसीचे 84 घाट आणि गंगा आरती पाहिली. हा अनुभव इतका समृद्ध होता की प्रत्येकाने आयुष्यात हा अनुभव एकदा घेतलाच पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळीच आयोध्येकडे प्रवास झाला. काशी ते आयोध्या हा सर्वात लांबचा प्रवास होता. पण सध्या यु पी मधील रस्ते अतिशय छान केलेले आहेत. त्यामुळे प्रवासाचा शिण आला नाही. वाटेत केदारने सर्वांना तब्बल सव्वा तास महाभारताची गोष्ट सांगितली. त्याने जे शंतनू-सत्यवती पासून सुरवात केली ते थेट अठरा दिवसांच्या महाभारताच्या युद्धाचे दिवसागणीत वर्णन करूनच तो थांबला. सर्वांना त्याचे फार कौतुक वाटले. वाटेत दुपारी आम्ही एका ढाब्यावर जेवायला थांबलो. म्हणजे जेवन आमचेच होते फक्त बैठकव्यवस्था त्यांची होती. तेथे मोटारसायकलचे इंजिन वापरून गॕरेजमध्ये तयार केलेली एक चार चाकी गाडी उभी असलेली पहायला मिळाली. संदिप पासवान या हुशार मुलाने ती गाडी तयार केली होती. सत्ते पे सत्ता चित्रपटात सात भावांकडे जशी गाडी होती तशीच गाडी त्याने तयार केलेली होती. ही गाडी तो शेतातील माल वाहण्यासाठी वापरत असला तरी चार चाकी गाडीत असलेल्या सर्व सुविधा त्याने या गाडीत तयार केलेल्या होत्या. आम्ही सर्व जन गाडीभोवती जमा झालेलो पाहुन त्या ढाब्याचे मालक असलेल्या आजोबांची मदत करत असलेला तो नातू आम्हाला गाडी दाखवायला आला. त्याने गाडी चालू करून आमच्यापैकी काही लोकांना तिच्यात चक्कर मारून आणली. गाडीचे सर्व फिचर दाखवले. गाडीच्या त्या प्रत्येक फिचर मध्ये त्याने वापरलेले बुद्धीकौशल्य दिसत होते. सर्वानी त्याच्या कामाची तारीफ केली. जाताना आमच्या पैकी ब-याच जनांनी त्याला प्रोत्साहन म्हणून बक्षिस दिले. मग पुढील प्रवास सुरू झाला. संध्याकाळी अयोध्येजवळ असलेल्या फैजाबादमध्ये असलेल्या आमच्या हॉटेल मध्ये मुक्काम पडला. सध्या काशी-आयोध्येतील पर्यटन प्रचंड वाढलेले असल्याने हॉटेल मिळणे दुरापास्त झाले आहे. आम्हाला अयोध्येऐवजी फैजाबादला हॉटेल मिळाले होते. रात्री आराम करून दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही आयोध्येला गेलो. सर्वप्रथम आम्ही पवित्र शरयु नदीचे दर्शन घेतले. मग आम्ही कारसेवापुरम वर्क शॉपला भेट दिली. येथे राममंदीरासाठी वापरण्यात येणाऱ्या शिला घडवण्याचे काम अनेक वर्षांपासून चालू आहे. आता हे काम जोरात चालू होते. राजस्थानी कामगार मन लावून शिलांवर कलाकुसर करत शिला घडवत होते. मी जावून नकळत एका वयस्क कामगाराच्या पाया पडलो. "अरे साहब, आप यह क्या कर रहे हो?" पाय मागे घेत तो बोलला. "आपके हाथसे बन रहे इन सुंदर शिलाओंसे हमारे राम का मंदीर बन रहा है. आप कितने भाग्यशाली हो! इसलिए आपके पैर छुए." का कुणास ठाऊक पण आमच्या दोघांच्या डोळ्यात आपोआप पाणी आले. माझ्या मुलागा केदार तर तेथे काम करत असलेल्या सर्व कामगारांच्या पाया पडला. आमच्या सोबत ट्रिप मध्ये 1992 ला कारसेवा केलेले एक स्नेही हजर होते. कारसेवापुरममधून बाहेर पडताना माझ्या संपुर्ण कुटुंबाने त्यांच्या पाया पडून कृतज्ञता व्यक्त केली. "कारसेवेत प्रत्यक्ष प्राणांची भीती होती. तरी फार मोठे धाडास केले तुम्ही! तुमच्यासारख्या लाखो कारसेवकांनी अनेक वर्षे केलेल्या संघर्षामुळे आज आम्हाला हे दिवस पहायला मिळत आहेत." असे म्हणताना मला गहिवरून आले. ते सुद्धा भारावून गेले. यावर कशी प्रतिक्रिया द्यावे हे कदाचित त्यांना समजेना. "आपण या विषयावर बोलू." असे म्हणत ते तेथून आमच्या गाडी कडे निघून गेले. त्यांनी केलेल्या कारसेवेच्या दोन वर्ष आधी मुलायमसिंग सरकारने येथे हजारो कारसेवकांना गोळ्या घालून ठार मारले होते. त्यांच्या प्रेतांना मोठे दगड बांधून त्यांना शरयू नदीत फेकून देण्यात आले होते. त्या अभाग्या जीवांच्या वाट्याला शेवटचा दाहसंस्कारही आला नव्हता. तिकडे केंद्रात काँग्रेसचे सरकार होते तर इकडे महाराष्ट्रातही काँग्रेसचेच सरकार होते. त्या वेळी दातीर काका तर महाराष्ट्र राज्याच्या सरकारी नोकरीत होते. सापडले असते तर नोकरी गेली असतीच पण जेल मध्ये वर्षानुवर्षे सडावे लागले असते. बायको आणि तीन लहान लहान मुले उघड्यावर पडली असती. तसे त्यांच्या नावाचे अटक वारंटही निघाले होते. पण सरकारी बाबूंनी चुकून दातीर ऐवजी दातार केल्याने ते थोडक्यात बचावले होते. घरादारावर तुळशीपत्र ठेवूनच कारसेवकांनी ही कारसेवा केली होती. पुढील पिढ्या त्यांच्या सदैव ऋणी असतील. पुढे आम्ही प्रत्यक्ष राममंदिराच्या कामाचे दर्शन घेतले. राममंदिराचा प्रचंड मोठा चौथारा बांधून तयार झाला आहे. कामाची भव्यता पाहून सर्व जन भारावून गेले. गेली पाचशे वर्षे या गोष्टीसाठी संघर्ष चालू होता. लाखो लोकांनी यासाठी आपले आयुष्य खापवले होते. शेकडो वर्षांच्या गुलामगीरीचे प्रतिक नष्ट करून करोडो हिंदूंचे स्वत्व पुन्हा जागे करणारे काम समोर चालू होते. बाबराला दुसरीकडे मशिद बांधायला जागा नव्हती असे नव्हते. पण स्थानिक लोकांचे सर्वोच्च श्रद्धास्थळ पाडून त्यावर आपले श्रद्धास्थळ उभारणे हे निव्वळ प्रतिकात्मक होते. तुम्ही केवळ राजकीय दृष्ट्या नव्हे तर सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या ही आमचे गुलाम झाले असल्याचा संदेश त्यातून दिला गेला होता. पाचशे वर्षांच्या या गुलामगिरीतून मुक्त होत असल्याच्या ऐतिहासिक घटनाक्रमाचे आपण साक्षीदार होत आहोत अशीच सर्वांची भावना झाली होती. श्रद्धा आणि समाधानाच्या भावाने सर्व जनांनी राममंदिराच्या चालू कामाचे दर्शन घेतले. राम मंदिर पुर्ण तयार झाल्यावर परत दर्शनाला येण्याचे मनोमन ठरवून सर्व जन तेथून बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी लखनौ वरून पुण्यासाठी विमान होते. सकाळी अयोध्या ते लखनौ असा प्रवास सुरू झाला. लखनौला पोहचल्यावर वेळ असल्याने बडा इमामवाडा पाहण्याचे ठरले. ही वास्तू अतिशय सुंदर आहे. आम्ही गाईडला प्रश्न विचारत होतो. "यहाँ नवाब साहब का दरबार कहाँ लगता था? और वे इसमे कहाँ रहते थे?" "यह जगह राजवाडा या उनका महल नही है. इस जगह का निर्माण अलग कारण से हुआ था. 1780 मे अवधमे बडा भयानक अकाल पडा था. उस वक्त चौथे नबाब असफ उदौला साहब नबाबकी गद्दी पर थे. यह भयानक अकाल दस साल तक चला था. लोग भुखसे मरने लगे तो नवाब साहबने खजाने के दरवाजे प्रजा के लिए खोल दिए. लेकिन खुद्दार प्रजाने मुफ्त मदत लेनेसे साफ मना कर दिया. फिर नवाब साहबने इस इमारतका निर्माण कार्य शुरू किया और लोगोंको रोजगार दिया. लोग दिन मे निर्माण कार्य करते. काम लंबा जारी रहे इस लिए नवाब साहबके लोग रात मै उसमेसे कुछ कार्य को गिरा देते. इस वजह से जब तक अकाल था तब तक यह काम जारी रहा. दस साल के अंत मे अकाल खत्म हुआ और यह वास्तू का निर्माण भी पुरा हो गया." संकटकाळी प्रजेसाठी खजाण्याचे दरवाजे उघडणारा नवाब असफ उदौला महान होताच. पण मला जास्त आश्चर्य वाटले ते अवध संस्थानाच्या प्रजेचे ! मोफत खाण्यापेक्षा भुकेने मरण पत्करलेले बरे असे मानणारी प्रजा किती स्वाभिमानी असेल? या पार्श्वभूमीवर गरीबांच्या अगतिकतेचा फायदा घेत मतांसाठी त्यांना मुफ्तखोरीचे व्यसन लावायचा प्रयत्न करणाऱ्या आजकालच्या एका नेत्याची मला आठवण झाली. भारतीय गरीब प्रजा अशीच स्वाभिमानी असल्याने या नेत्याची डाळ भारतात फारशी शिजणार नाही याची मला खात्री पटली. सुज्ञ जनता भारताचा कधीही व्हेनेझुएला होऊ देणार नाहीत या बाबत शंका उरली नाही. यानंतर मग लखनौ विमानतळाकडे प्रवास झाला. आमच्या आचा-यांनी रात्रीच्या जेवनाची शिदोरी सोबत दिली होती. रात्रीचे जेवन विमानतळावरच झाले. रात्री विमान पुण्याकडे उडाले. विमानातून बाहेर पाहताना डोक्यात विचार येत होते... सुंदर नियोजन सहज प्रवास सुग्रास भोजन सुरम्य तिर्थस्थळे आणि सज्जनांचा सहवास म्हणजेच सफळ-संपुर्ण तिर्थयात्रा डॉ गोपालकृष्ण गावडे पुणे

Comments

Popular posts from this blog

देवभूमी केरळ

SURYA KUND GUJARAT